Overviewकोजागिरी पौर्णिमा उत्सव’ २०१९

हवेतला उष्मा हळूहळू कमी होऊ लागला की चाहूल लागते ती अश्विन महिन्याची, अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या दिवशी चंद्राच्या शीतल आणि मंद प्रकाशाने सारं नभांगण उजळून निघतं. या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त स्नेहबंधने एका अभिनव कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच केले होते.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे प्रसिद्ध पत्रकार व लेखक श्री. सचिन जगदाळे यांचे अभिवाचन.
सचिनजी लिखित ‘गुलाबराव पारनेरकर (भाग २)’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले, हा पुस्तक प्रकाशन सोहळा एकाच वेळेस सोहार, दुबई, अमेरिका तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये साजरा करण्यात आला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असल्याने एका नव्या विश्वविक्रमाचीच नोंद त्यायोगे झाली.
सर्व महाराष्ट्रीय मंडळी संध्याकाळी नियोजित वेळेत फार्महाऊसवर जमली आणी कार्यक्रमाचे नोंदणी झाल्यानंतर सर्वांनी चहा व अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. श्री. सचिन जगदाळे, डाॅ. विद्यानंद वैद्य, श्री. शशिकांत डोणगावकर, श्री. नितीन जहागीरदार व श्री. अरुण साठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. उपस्थित प्रेक्षकांना श्री.जगदाळे यांनी विश्वविक्रमी सोहळ्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. स्थानिक वेळेनुसार बरोबर साडेसात वाजता, डाॅ. विद्यानंद वैद्य यांच्या शुभहस्ते, स्नेहबंधच्या आयोजन समिती सदस्य व सुमारे दीडशे प्रेक्षकांच्या उपस्थितीत नियोजीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला. सोहळ्याचे थेट प्रक्षेपण श्री. जगदाळे यांच्या फेसबुक पेजवरही झाले. इतर सर्वठिकाणी झालेल्या प्रकाशन सोहळ्यांची क्षणचित्रे प्रेक्षकांना सादर करताना सर्वांनाच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाल्याचे अप्रुप वाटले.
सचिनजींनी ‘माझी पुणेरी बायको’ आणि ‘गुप्तेकाका’ या व्यक्तीचित्रांचे त्यांच्या खास ओघवत्या शैलीत अभिवाचन केले. आपल्या या विनोदी आणि चतुरस्त्र शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले, अतिशय सुंदर असे अभिवचन झाले, हसता हसता नकळतंच प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा कधी ओल्या झाल्या हे कळलेच नाही. आपल्या बहारदार वक्तृत्वशैली मुळे सचिनजीनी प्रेक्षकांची मने जिंकली अभिवाचनानंतर प्रेक्षकांच्या जिवंत प्रतिक्रिया आल्या. सर्वांना अभिवाचन खूप आवडले होते, सचिनजीनी प्रथमच आखाती देशात येऊन अशा प्रकारे अभिवाचन केल्याचे सांगितले व संधी मिळाल्यास पुन्हा असे कार्यक्रम सादर करण्याची इच्छाही व्यक्त केली.
अभिवाचनानंतर सोडतीद्वारे तीन भाग्यवान महिला व तीन पुरुष यांची निवड करण्यात आली. भाग्यवान विजेत्यांना सचिनजींनी स्वतः आणलेली खासवस्तु भेट देण्यात आली.
सर्व मंडळींनी स्वरुचीभोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला.
स्नेहबंध कलाविष्कार अंतर्गत हौशी गायकांनी ‘चंद्र आहे साक्षीला’ ही गाण्याची बहारदार मैफल सादर केली. एकापेक्षा एक सरस अशी गाणी प्रस्तुत करत प्रेक्षकांची मने जिंकली. श्री. अभय वडजीकर यांनी पुढाकार घेऊन या सुरेल मैफीलीची आखणी केली होती.
कार्यक्रमाची सांगता अर्थातच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तयार केलेल्या खास मसाला दुधाने झाली. मसाला दुधाचा आस्वाद घेत उत्कृष्ट अशी मराठी गाण्यांची मैफल पार पडली.
कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन स्नेहबंध आयोजन समितीने केले होते. सौ. मनीषा पाटील यांनी स्टेज व सेल्फी पॉइंट यांची सजावट केली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रियंका जाधव आणि सौ. राजेश्री यशवंतराव यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण व ध्वनीचित्रमुद्रण, श्री. राजेंद्र लवंगारे आणि श्री. देवदत्त उज्जैनकर यांनी सांभाळले. सौ. समिक्षा (चंदा) गोरे यांनी मसाला दूध तयार करण्यासाठी हातभार लावला.

अशाप्रकारे सर्वांनीच हातभार लावल्यामुळे कोजागिरीचा हा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा झाला, शरद ऋतूतील ही पौर्णिमा सोहारमधील महाराष्ट्रीय मंडळींच्या नक्कीच स्मरणात राहील.

सौ. प्राची मंदार साठे.
१४ ऑक्टोबर २०१९

अधिक पहा

यशोगाथा

Media Galleryगॅलरी

Our Teamआयोजन समिती

No posts

Contact Usआमच्याशी संपर्क साधा

Email Address:

snehbandhsohar@gmail.com