पतंगोत्सव’ २०१९

‘सोहार ‘ ओमान मधले एक छोटंसं शहर. विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेलं, टुमदार घरं आणि गल्फच्या मानाने बर्‍यापैकी हिरवंगार. अशा या छोट्याशा शहरात विविध देशांमधील लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यात आपला महाराष्ट्रही अग्रेसर आहे. इथे अनेक मराठी कुटुंब नोकरी-व्यवसायानिमित्त आपला देश सोडून स्थायिक झाली आहेत.

अशा अनेक मराठी माणसांना एकत्र जोडण्याच्या उद्देशाने ‘स्नेहबंध’ ची निर्मिती झाली. आपल्या मधील काही हौशी मंडळींनी एकत्र येऊन स्नेहबंध अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. यात विविध सण साजरे करणं, ग्रंथालय चालवणं, लहान मुलांसाठी अनेक खेळ स्पर्धा घेणं, महाराष्ट्र दिन साजरा करणं असे अनेक उपक्रम राबवले जातात. याच ‘स्नेहबंध’ ची स्वतःची वेबसाईट सुरू  करण्यात आली आहे. त्यावरचा हा पहिलाच लेख.

इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येतो तो आपला मराठमोळा सण मकर संक्रांत. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत एकमेकांना तिळगूळ दिला जातो. या संक्रांतीच्या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी पतंगोत्सव साजरा केला जातो. असा हा पतंगोत्सव स्नेहबंध अंतर्गत नुकताच साजरा केला गेला. या कार्यक्रमात अनेक मराठी तसेच इतर भाषिक कुटुंबे सहभागी झाली होती. सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व जण उवेनातच्या निळयाशार समुद्र किनारी जमा झाले. चहा आणि पोह्यांचा आस्वाद घेऊन पतंगबाजी ला सुरुवात झाली. सर्वांनीच पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला. हळूहळू ऊन वाढू लागलं पण हवेत सुखद गारवा असल्यामुळे खेळाची मजा द्विगुणीत झाली. पुरुष मंडळी, महिला, लहान मुलं सर्वजण पतंग उडवण्यात दंग झाले होते. काही बच्चेकंपनीनी समुद्राच्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटला. तर काही जणांनी तिथे मैदानी खेळ खेळले, तर काही फोटोग्राफी करण्यात गुंग होते. पतंग उडवून झाल्यानंतर सर्वांनी चविष्ट पावभाजी चा आस्वाद घेतला.

अशाप्रकारे नवीन वर्षातील हा पहिला कार्यक्रम खुपंच उत्साहात साजरा झाला. शेवटी वेळ झाली ती निरोपाची सर्व मंडळी एकमेकांना निरोप देऊन निघाली पतंगोत्सवाच्या आठवणी मनात साठवून सर्वजण नक्कीच पुढच्या कार्यक्रमाची आतुरतने वाट बघत असतील यात शंकाच नाही. स्नेहबंध परिवारात असेच विविध कार्यक्रम उत्तरोत्तर होत राहोत हीच सदिच्छा. 

सौ. प्राची मंदार साठे.

सोहार, २०.०१.२०१९

Contact Usआमच्याशी संपर्क साधा

Email Address:

snehbandhsohar@gmail.com